नाशिक, (प्रतिनिधी) २५ डिसेंबर - महापालिका निवडणुकीचा ज्वर आता आणखानच वाढत चालला आहे. गुरुवार सकाळपासून शहरात राजकीय घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर यतीन वाघ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे, मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील आदींनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे विनायक पांडे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला भाजप नाशिक मनपा निवडणूक प्रभारी तथा आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला आहे. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी हा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. दरम्यान नाशकात शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना मोठा धक्का बसला आहे.
नाशकातील घडामोडी खालीलप्रमाणे
राज आणि उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत युतीची घोषणा केली. त्याचा आनंद साजरा करणारे मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील हे संपूर्ण कुटुंबासह पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या भाजपा प्रवेशानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांच्या आणि भाजपच्या विरोधात दिल्या घोषणा.
दरम्यान, भाजप प्रवेश करण्यासाठी आलेल्या नेत्यांना पोलिसांनी बराच काळ बाहेरच थांबवलं होतं. भाजप कार्यालयापासून काही अंतरावर पोलिसांनी या नेत्यांना थांबवलं. विरोध करणारे आणि प्रवेश करणारे असे दोन्ही गट आमने-सामने येतील यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती.
गिरीश महाजन यांना भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर घेरले.. !!
"जे सोडून गेले ते गेले, आम्ही मात्र जनतेसोबत ठाम उभे आहोत. स्वाभिमान आमचा श्वास आहे!" ठाकरे गटाकडून पोस्टरबाजी
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी महापौर विनायक पांडे , माजी नगरसेविका अनिता पांडे , ऋतुराज पांडे, प्रभाग क्रमांक १३ च्या उमेदवार आदिती ऋतुराज पांडे यांनी भारतीय जनता पार्टीत मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
या पक्षप्रवेशानंतर विनायक पांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 43 वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय पण, मागच्या निवडणुकीत देखील माझं, मुलाचं तिकीट कापलं. यावेळी देखील तीच अवस्था आहे. मी संजय राऊत यांच्याशी बोललो पण त्यांच्याकडून काहीही उत्तर आलेले नाही. एवढ्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक मिळत असले तर काय उपयोग म्हणून मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना सोडताना मला नक्कीच दुःख होतंय, पण विकास करायचा असेल तर ते भाजपात जाऊनच शक्य आहे, असे पांडे म्हणाले.
"जे आपल्या सर्वांच्या मनात होते तेच केले. जुन्या नाशिकच्या विकासाचे आभाळ मोकळे झाले" भाजप पक्ष प्रवेशानंतर शाहू खैरे यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून दिनकर पाटील यांची हकालपट्टी. मनसे नेते शिरीष सावंत यांनी काढले आदेश
विनायक पांडे यांच्या पक्ष प्रवेशावरून भाजपातही महाभारत घडल्याचे समोर आले. “प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे, असे सांगत भाजपा आमदार देवयानी फरांदे आणि निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे थेट सोशल मीडियावर पोस्ट टाकली. माजी महापौर विनायक पांडे आणि काँग्रेस नेते माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या प्रवेशाला फरांदे यांचा विरोध होता. तसेच पक्षप्रवेशा संदर्भात आपल्याला विश्वासात न घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही, जय श्री राम, असेही त्यांनी म्हटले आहे.
माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते नितीन भोसले व माजी नगरसेविका वैशाली भोसले यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश.
नुकताच भाजपामध्ये प्रवेश करून शाहू महाराज खैरे आणि यतीन वाघ हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत जात असताना रस्त्यात असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या शालिमार येथील कार्यालयसमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली