नंदुरबार, (प्रतिनिधी) २५ डिसेंबर - निपुण भारत अभियानाच्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण शाळा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांनी स्वतःचे रूप पालटण्यास सुरुवात केली असून, 'स्वच्छ आणि सुंदर शाळा म्हणजेच निरोगी, आनंदी आणि सक्षम विद्यार्थी' या संकल्पनेतून 'स्वच्छतेकडून सुंदरतेकडे' हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.
हा उपक्रम मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल तसेच मा. प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, उपशिक्षणाधिकारी श्रीम. वंदना वळवी यांच्या प्रेरणेतून, गटशिक्षणाधिकारी श्री. शेखर धनगर, विस्तार अधिकारी श्री. वसंत जाधव, श्री. ज्ञानदेव केदार व श्रीमती आरती शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
लोकसहभागातून शाळेचा कायापालट:
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा, खुषगव्हाण येथे शाळेचे आकर्षक व सुसज्ज रूप पाहायला मिळत आहे. लोकसहभागातून शाळेची प्रशस्त इमारत, वर्गातील बोलक्या भिंती, सुंदर वर्गसजावट, विद्युत सुविधा, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर (बेंचेस), वर्ग व कार्यालयात पंखे, विद्यार्थी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, शालेय मैदानात पिवर ब्लॉक, पिण्याच्या पाण्याची सोय, हँडवॉश स्टेशन, आकर्षक प्रवेशद्वार तसेच बोलकी संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे.
१०० टक्के शालेय उपस्थिती:
स्वच्छ, सुरक्षित व आनंददायी शालेय वातावरणामुळे विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती दिसून येत आहे. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी विद्यार्थ्यांमध्ये रुजत असून, शाळेत लावण्यात आलेले आरसे विद्यार्थ्यांना नीटनेटके राहण्यास प्रेरणा देत आहेत.
नयनरम्य व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण:
प्रकाशमान व सुरक्षित परिसर, रंगीत भिंतींवरील वाचनीय मजकूर आणि शैक्षणिक भित्तीचित्रांमुळे विद्यार्थ्यांचे शाळेशी नाते अधिक घट्ट होत असून, शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होत आहे.
गावकऱ्यांचे मोलाचे योगदान:
शाळेच्या संपूर्ण कायापालटासाठी गावच्या सरपंच श्रीमती प्रियंका पाडवी, श्री. विनोद पाडवी, शा.व्य.स. अध्यक्षा श्रीमती ज्योती पाडवी, राजविहीर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. योगेश शिंपी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंद सूर्यवंशी तसेच शिक्षक श्री. दशरथ कोकणी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
हा उपक्रम म्हणजे स्वच्छता, सौंदर्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा उत्तम संगम असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.