येवला, (प्रतिनिधी) २५ डिसेंबर - अतिवृष्टीमुळे मका आणि सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी शासकीय खरेदी केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आले असून शासकीय खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते अंगणगाव येथे येवला खरेदी विक्री संघाच्या शासकीय मका व सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मका MSP दर २४०० प्रति क्विंटल दराने हेक्टरी ३६.८० क्विंटल खरेदी केली जाणार आहे. तर सोयाबीन MSP ५३२८ प्रति क्विंटल दराने हेक्टरी २७ क्विंटल खरेदी केली जाणार आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना विविध तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता तसेच इतर कारणांमुळे वेळेत नोंदणी करता आली नव्हती. या पार्श्वभूमीवर नोंदणीस मुदतवाढ देण्याबाबत शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री भुजबळ साहेब यांनी मका, ज्वारीसह भरड धान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी नोंदणी करून खरेदी केंद्रावर मका व सोयाबीन विकावी असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार येवल्यात अधिक दोन केंद्र निर्माण करण्यात येतील. याठिकाणी गोडाऊन उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच मका सोयाबीन सह शेतमालाची साठवणूक करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवल्यात अधिक गोडाऊन देखील बांधण्यात येईल. शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावली जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.
मका आणि सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या आशेने पीक घेतलं. मात्र बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले. ही परिस्थिती शासनाला मान्य नव्हती आणि म्हणूनच किमान आधारभूत किंमतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला हक्काचा दर देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. याच भावनेतून शासनाने किमान आधारभूत किंमतीने (MSP) मका व सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं, त्यांच्या मेहनतीवर विश्वास दाखवणं आहे. ही संपूर्ण खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी हिताची असून शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, येवला बाजार समितीचे सभापती वसंत पवार, उपसभापती रतन बोरनारे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, संभाजी पवार, येवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, मच्छिंद्र थोरात, मकरंद सोनवणे, अल्केश कासलीवाल, संजय बनकर, मनोज रंधे, सुमित थोरात, सुनील देशमुख, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, नगरसेवक गोटू मांजरे, जावेद लखपती, नितीन गायकवाड, मलिक मेंबर, भूषण लाघवे, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, दीपक गायकवाड, सचिन सोनवणे, समाधान पगारे, नितीन आहेर, पार्थ कासार, निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका निबंधक राजपूत,पुरवठा अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी, गोदामपाल गणेश खिल्लारे यांच्यासह खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.