आडगाव ट्रक टर्मिनस येथे सुरू होणार आहे केंद्र...

Share:
Main Image
Last updated: 25-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) २५ डिसेंबर - आडगाव ट्रक टर्मिनल येथे चालकांसाठी सारथी सुविधा केंद्र निर्माण करणे. तसेच शहराच्या लगत बंद पडलेल्या जकात नाक्यांवर ट्रक टर्मिनल विकसित करून पार्किंगची सुविधा निर्माण करण्यात येईल. याबाबत नाशिक महानगरपालिका सकारात्मक असून नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्टच्या मागण्या मार्गी लावल्या जातील असे आश्वासन नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी दिले.

नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासोबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच मनपा कार्यालयात पार पडली. या बैठकीत आडगाव नाका येथील ट्रक टर्मिनल परिसरात ‘सारथी सुविधा केंद्र’ उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, याबाबत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या बैठकीदरम्यान नाशिक शहराच्या लगत बंद पडलेल्या जकात नाक्यांचा उपयोग आगामी कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या वाहनांच्या पार्किंगसाठी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. कुंभमेळ्यानंतर सदर जागा पुढे नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनला ट्रक पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासन सकारात्मक असून, यासाठी आवश्यक नियोजन व कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

आडगाव ट्रक टर्मिनल येथे प्रस्तावित ‘सारथी सुविधा केंद्रा’मुळे वाहनचालक व वाहतूकदारांना आवश्यक शासकीय सेवा, मार्गदर्शन, विश्रांती सुविधा तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक व्यवस्थाही अधिक सुव्यवस्थित होण्यास मदत होणार आहे.

शहराच्या हद्दीतील व लगतच्या बंद जकात नाक्यांवर अत्याधुनिक सोयी सुविधांयुक्त ट्रक टर्मिनल विकसित करण्यासाठी नाशिक महानगरपालिका प्रयत्नशील राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या उपक्रमामुळे शहरातील अवजड वाहनांची गर्दी कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होईल.

या बैठकीस नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम. सैनी, चेअरमन राजेंद्र नाना फड, सल्लागार जयपाल शर्मा, उपाध्यक्ष शंकर धनावडे, सुभाष जांगडा, सेक्रेटरी बजरंग शर्मा यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे नाशिक शहरातील ट्रान्सपोर्ट क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून, वाहतूकदारांच्या दीर्घकालीन मागण्यांना न्याय मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

No comments yet.