नाशिक, (प्रतिनिधी) २४ डिसेंबर - शहरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याची मालिका सुरू असून, वेगवेगळ्या भागात राहणारी तीन मुले काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यात दोन मुलींसह एका मुलाचा समावेश आहे. सदर मुलांना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा अंदाज कुटूंबियांनी वर्तविला आहे. याबाबत पंचवटी,अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पेठरोडवरील तीन पुतळा भागात राहणारी मुलगी मंगळवार (दि.२३) सकाळपासून बेपत्ता आहे. तिला कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने कुटूबियांनी पोलीसात धाव घेतली असून याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शरद पाटील करीत आहेत. दुसरा प्रकार सिडको भागात घडला. पवननगर परिसरात राहणारी मुलगी सोमवार (दि.२२) पासून बेपत्ता आहे. दुपारच्या सुमारास घराबाहेर पडली ती अद्याप परतली नाही तिला कोणी तरी फूस लावून पळवून नेल्याचा अंदाज पालकांनी वर्तविला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत. तर जेलरोड भागात राहणारा अल्पवयीन मुलगा रविवारी (दि.२१) सायंकाळी घरात कुणासही काही न सांगता निघून गेला आहे. सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने पालकांनी पोलिसात धाव घेतली असून त्याला कोणीतरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कुऱ्हाडे करत आहेत.
किरकोळ वादातून महिलेचा विनयभंग
नाशिक : किरकोळ वादातून शेजारी राहणाऱ्या कुटूंबीयांनी दाम्पत्यास मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना देवळाली गावात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल जावरे,जयश्री जावरे व बाळा जावरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. घरासमोरून दुचाकीवर जाणाऱ्या राहूल जावरे यास थोडे थांबण्याचा सल्ला दिल्याने संशयिताने अश्लिल शिवागाळ करीत विनयभंग केला. या घटनेत महिलेस जमिनीवर खाली पाडून मारहाण करण्यात आली असून यावेळी तिच्या पतीने पत्नीच्या मदतीसाठी धाव घेतली असता त्यासही कुटुंबीयांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार मिलींद शेजवळ करीत आहेत.