नाशिक, (प्रतिनिधी) २४ डिसेंबर - गोदावरी नदी पात्रात मिळून आलेल्या तरूणाच्या मृतदेहाबाबत मोठा खुलासा झाला आहे. व्यावसायिक बंधूंनी त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल जीवनलाल समदडीया व तुषार जीवनलाल समदडीया अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बंधूची नावे आहेत. याबाबत अरूण लक्ष्मण धनाईत (रा.यमुनानगर चांदशी) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित मोबाइल विक्री करणाऱ्या एका नामांकित कंपनीचे वितरक आहेत. समदडीया बंधूचे शहरासह वणी ता. दिंडोरी येथेही मोबाईल विक्री एजन्सी आहे. संशयितांच्या शॉपमध्ये मृत प्रवीण अरुण धनाईत (२९) हा युवक लेखापाल म्हणून कार्यरत होता.
गेल्या आठवड्यात समदडीया यांनी दिलेल्या फियार्दीवरून वणी पोलीस ठाण्यात कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी लेखापाल प्रविण धनाईत याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्यात त्यास अटक केली असता न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला होता. मंगळवारी (दि.२३) सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह आनंदवली परिसरातील गोदावरी नदीपात्रात तरंगताना आढळून आला. समदडीया बंधूनी त्यास दुकानात बोलावून घेत बाऊंसरच्या मदतीने मारहाण केल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरराव करीत आहेत.
१६ वर्षीय मुलाची आत्महत्या
नाशिक : विहीतगाव भागात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. सदर मुलाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विक्की एकनाथ निकम (रा.विटभट्टीजवळ, वालदेवीनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. विक्की निकम याने मंगळवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील अडगईला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूबियांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.
कोयता बाळगणाऱ्या तरुणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नाशिक : दहशत माजविण्याच्या उद्देशाने कोयता बाळगणाऱ्या तरुणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मेडिकल कॉलेज भागातील वसंतदादानगर झोपडपट्टी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून संशयिताच्या ताब्यातून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ प्रकाश खंदारे (१९ रा.वसंतदादानगर झोपडपट्टी, आडगाव मेडिकल कॉलेज शेजारी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कोयताधारीचे नाव आहे. वसंतदादानगर झोपडपट्टी परिसरात वावरणाऱ्या एका तरुणाकडे धारदार कोयता असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२३) पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या अंगझडतीत कोयता सापडला असून याप्रकरणी अंमलदार अक्षय गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार वाघ करत आहेत.