चांदीचे भाव गगनाला भिडले... चोरट्यांनी मंदिरातील चांदीचा मुकुटच लांबवला...

Share:
Last updated: 24-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) २४ डिसेंबर - मंदिरात शिरून चोरट्यांनी थेट चांदीचा मुकुटच चोरून नेला. ही घटना देवळाली गावातील सूर्यमुखी गणेश मंदिरात घडली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी रंगनाथ लवटे (रा.लवटेनगर, कदम डेअरी जवळ जयभवानीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लवटे देवळाली गावातील प्रशिध्द सुर्यमुखी गणेश मंदिराची देखभाल करतात. मंगळवारी (दि.२३) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गाभाऱ्यातील जाळीचे गज कापून ही चोरी केली. श्री सुर्यमुखी गणेश मुर्तीस परिधान केलेला सुमारे ९०० ग्रॅम वजनाची व १ लाख ९० हजार रूपये किमतीचा चांदीचा मुकूट भामट्यांनी चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

चोरट्यांचा पावणे चार लाखांच्या ऐवजावर डल्ला 

शहरातील म्हसरूळ भागात झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी पावणे चार लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल वसंतराव रामटेके (रा. विठ्ठलपार्क इंद्रप्रस्थनगर मखमलाबाद शिवार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रामटेके या सोमवारी (दि.२२) पिंपळगाव गरूडेश्वर येथे गेल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ५० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याच दिवशी परिसरातील स्काय पार्क सोसायटीत राहणारे प्रभाकर पुंडलिक राऊत यांचेही घर फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला असून दोन्ही घटनांप्रकरणी पोलीस दप्तरी एकत्रीत नोंद करण्यात आली आहे. तर तिसऱ्या घरफोडीबाबत दीपक बापुराव पवार (रा.अवध रो हाऊस,तवलीफाटा पेठरोड मखमलाबाद शिवार) यांनी फिर्याद दिली आहे. पवार कुटूंबिय गेल्या शनिवारी (दि.२०) विवाह सोहळ्यानिमित्त कळवण येथे गेले असताना ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून कपाटातील सुमारे ७४ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अंलकार चोरून नेले. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

कुरिअरचे ऑफिस फोडून चोरट्यांनी लंपास केली रोकड

नाशिक : कुरिअरचे ऑफिस फोडून चोरट्यांनी रोकड चोरून नेली. ही घटना जेलरोड येथील मोगल हॉस्पिटल भागात घडली. या घटनेत ९३ हजार रूपयांच्या रोकडवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश एकनाथ कुंभकर्ण (रा.हिरावाडी पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. कुंभकर्ण ब्ल्यू डार्ट या कुरिअर कंपनीत कार्यरत असून त्यांचे जेलरोड भागातील कैलास दीप सोसायटीत कार्यालय आहे. सोमवारी (दि.२२) रात्री अज्ञात चोरट्यांनी ऑफिस फोडून कपाटात ठेवलेली ९२ हजार ५२० रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

Comments

No comments yet.