नाशिक, (प्रतिनिधी) २४ डिसेंबर - भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत असून, त्याग, संघर्ष आणि बलिदानाच्या शताब्दी वर्षानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्हा व शहर कमिटीच्या वतीने मंगळवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी ‘लाल झेंडा मार्च’ आयोजित करण्यात आला आहे. या रॅलीची सुरुवात दुपारी १ वाजता इदगाह मैदान (गोल्फ क्लब), नाशिक येथून होणार आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गेल्या शंभर वर्षांत भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्तिसंग्राम अशा ऐतिहासिक संघर्षांत मोलाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही कामगार, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या हक्कांसाठी रस्त्यावरील आंदोलनांसह भारतीय संसदेमध्येही पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद केला आहे.
आज भारतीय स्वातंत्र्यलढ्यातून घडलेल्या भारतीय संविधानातील लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता ही मूलभूत मूल्ये धोक्यात आली आहेत. सरंजामी, जातीय व कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या शोषणामुळे कामगार, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व कष्टकरी जनता नव्या गुलामगिरीकडे ढकलली जात असून, फॅसिझमच्या माध्यमातून दडपशाहीची यंत्रणा राबवली जात असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
या पार्श्वभूमीवर संघर्ष आणि बलिदानाची शताब्दी परंपरा जनतेच्या लढ्यांत अधिक व्यापक करण्याची ऐतिहासिक जबाबदारी स्वीकारत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे हितचिंतक, सभासद, विविध जनसंघटनांचे पदाधिकारी, सदस्य तसेच समविचारी पक्ष व संघटनांनी ‘लाल झेंडा मार्च’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आवाहनावर पुढील पदाधिकारी व नेत्यांच्या सह्या आहेत :
कॉम्रेड राजू देसले (भाकप राज्य सहसचिव),
कॉम्रेड मनोहर पगारे (भाकप जिल्हा सचिव),
कॉम्रेड देविदास भोपळे (भाकप जिल्हा सहसचिव),
कॉम्रेड तल्हा शेख (भाकप शहर सचिव),
कॉम्रेड प्राजक्ता कापडणे (भाकप शहर सहसचिव),
कॉम्रेड भीमा पाटील (राज्य कौन्सिल सदस्य),
कॉम्रेड भास्कर शिंदे,
कॉम्रेड दत्तू तुपे,
कॉम्रेड व्ही. डी. धनवटे,
कॉम्रेड सुनीता कुलकर्णी,
कॉम्रेड मीना आढाव,
कॉम्रेड किरण डावखर,
कॉम्रेड नामदेव बोराडे,
कॉम्रेड समीर शिंदे,
कॉम्रेड अनिल पठारे,
कॉम्रेड कैलास मोरे,
कॉम्रेड रामदास भोंग,
कॉम्रेड केदारे बाबा,
कॉम्रेड पद्माकर इंगळे,
कॉम्रेड रमेश पवार,
कॉम्रेड नितीन शिराळ.