नागपूर, (प्रतिनिधी) २४ डिसेंबर - मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका पाच वर्षांच्या बालकाने विषारी कफ सिरप प्यायल्याच्या संशयावरून त्याला अत्यंत गंभीर अवस्थेत एम्स नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल तीन महिन्यांच्या यशस्वी उपचारांद्वारे या बालकाचे प्राण वाचवले आहेत.
11 सप्टेंबर 2025 रोजी या बालकाला संपूर्ण कोमामधील अवस्थेत नागपूरच्या एम्समध्ये पीआयसीयू अर्थात बालकांच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. त्याचा रक्तदाब अत्यंत कमी झाला होता आणि मेंदूच्या प्रतिक्षिप्त क्रिया जवळजवळ बंद झाल्या होत्या. त्याला त्वरित व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि दाखल केल्याच्या काही तासांतच आपत्कालीन डायलिसिस सुरू करण्यात आले.
बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी गिरीश यांच्या नेतृत्वाखाली आणि पीआयसीयू प्रभारी डॉ. अभिजित चौधरी, डॉ. अभिषेक मधुरा आणि विशेष बालरोगतज्ज्ञांच्या पथकाने या बालकाच्या उपचारांमध्ये लक्ष घातले. यामध्ये अतिदक्षता विभागातील बालरोगतज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट बालरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट्स आणि नेत्ररोगतज्ज्ञांचा, परिचारिका आणि पुनर्वसन पथकाचा समावेश होता. अतिशय गंभीर कोमा अवस्थेत असूनही या बालकाला सातत्याने जीवरक्षक प्रणालीवर ठेवून उपचार करण्यात आले. त्यामुळे चेतातंतूविषयक सुधारणा होऊ लागल्या. मात्र, या उपचारादरम्यान या बालकाला गंभीर सेप्टिसेमिया आणि शॉकचा त्रास झाला, ज्यामुळे अत्याधुनिक हृदयरोगविषयक उपचार आणि वारंवार रक्तबदल करावा लागत होता. त्याबरोबरच दीर्घकालीन प्रतिजैविक उपचार द्यावे लागत होते. दीर्घकाळ व्हेंटिलेटरसाठी त्याची 'ट्रॅकीओस्टोमी' देखील करण्यात आली.
सुमारे तीन महिन्यांच्या सातत्यपूर्ण उपचारानंतर, मुलाला व्हेंटिलेटरवरून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले आणि जास्त निगा आवश्यक असलेल्या रुग्णांच्या कक्षात हलवण्यात आले. हळूहळू त्याची बोलण्याची आणि प्रतिसाद देण्याची क्षमता परत आली असून तो आता पालकांशी संवाद साधत आहे. ऑप्टिक नर्व्ह खराब झाल्यामुळे त्याच्या दृष्टीवर गंभीर परिणाम झाला होता. परंतु वेळेवर केलेल्या डोळ्यांच्या उपचारांमुळे त्याला आता प्रकाश जाणवू लागला आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ रुग्णालयात राहिल्यानंतर, आता त्याची प्रकृती स्थिर असून त्याला घरी सोडण्याची तयारी सुरू आहे.
एम्स नागपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश नागदेवे आणि संयुक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन मराठे यांनी सर्व आवश्यक संसाधने, डायालिसिस सुविधा, रक्त उत्पादने आणि वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. विशेष म्हणजे, एम्स नागपूरने या मुलाच्या उपचारांचे सर्व शुल्क पूर्णपणे माफ केले आहे, जे संस्थेच्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवते.