राज आणि उद्धव यांची युती होताच भाजपने दिली ही प्रतिक्रिया

Share:
Main Image
Last updated: 24-Dec-2025

मुंबई, (प्रतिनिधी) २४ डिसेंबर - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे ही ऐतिहासिक पर्वाची नांदी नसून उबाठा आणि मनसेच्या ऐतिहासिक पराभवाची नांदी ठरेल, असा प्रहार भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते. उद्धव ठाकरे काँग्रेस, शरद पवारांबरोबर गेल्यानंतर या दोन्ही पक्षांचे बारा वाजले हा इतिहास राज ठाकरेंनी विसरू नये. उबाठा बरोबर जाऊन राज ठाकरेंच्या वाट्यालाही पराभवाखेरीज काही येणार नाही, असेही श्री. बन यांनी सांगितले.

संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना श्री. बन म्हणाले की, उबाठा आणि मनसे सत्तेसाठी एकत्र येत आहेत, मुंबईसाठी नाही, मुंबईकरांसाठी नाही. उबाठा- मनसेची फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी हातमिळवणी झाली आहे. या दोन्ही पक्षांचा विकासाचा अजेंडा नाही, फक्त सत्तेचा हिशेब डोक्यात ठेवूनच हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. हे दोन पक्ष एकत्र येणं ही  ताकद नाही तर या दोघांच्याही  पराभवाची कबुली आहे, असा टोलाही श्री. बन यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मेट्रो, कोस्टल रोड या सारखे सामान्य मुंबईकराच्या फायद्याचे प्रकल्प रोखले. मेट्रो, कोस्टल रोड थांबवून मुंबईकरांचा वेळ चोरला. याबद्दल त्यांनी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे. बीडीडी घरं महाग केली याचीही जबाबदारी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी स्वीकारली पाहिजे, असेही श्री. बन म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वचननामा सादर करण्याअगोदर उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी माफीनामा सादर केला पाहिजे, अशी खिल्ली उडवत श्री. बन म्हणाले की, मारहाण, खंडणी आणि भयाचं राजकारण हीच उबाठा – मनसेची ओळख आहे. उबाठा आणि मनसेचा मुंबईकरांना मारहाण करण्याचा इतिहास कोणीच विसरणार नाही.

बाळासाहेब ठाकरे हे सर्वार्थाने  ब्रँड होते. विचार सोडले, हिंदुत्व विसरले त्यामुळे उबाठाचा बँड वाजला आहे. हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड न केल्यामुळे वंदनीय बाळासाहेबांचे आशीर्वाद भाजपाला मिळतील, असेही श्री. बन म्हणाले.

बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल ??

शिवसैनिकांवर मशिदीतून दगडफेक करणाऱ्या संभाजीनगरच्या रशीद मामूला पक्षात घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. यातून उद्धव ठाकरेंची मराठी माणसावर नाही तर मामूवर मदार आहे हेच दिसले आहे. 

रशीद मामूसोबत सत्तेसाठी हातमिळवणी केल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती वेदना होत असतील याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला आहे का, असा घणाघातही श्री. बन यांनी केला.

Comments

No comments yet.