अखेर शिवसेना-मनसे युतीची घोषणा... संयुक्त पत्रकार परिषदेत राज आणि उद्धव काय म्हणाले?

Share:
Main Image
Last updated: 24-Dec-2025

मुंबई, (प्रतिनिधी) २४ डिसेंबर - मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे ) यांच्यातील युतीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला  आहे. जागा वाटपाचा कळीचा मुद्दाही यशस्वीपणे निकाली काढण्यात आला आहे. मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. राज आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढतील. 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषेदपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. 

मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या घोषणेसाठीच ही पत्रकार परिषद असल्याचा अंदाज होताच. पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाल्याचे जाहीर केले. आपापसातील वादापेक्षा महाराष्ट्र महत्त्वाचा आहे, असं मी माझ्या एका मुलाखतीत म्हटलं होतं, तेव्हापासूनच शिवसेना - मनसे एकत्र येण्यास सुरुवात झाली, याची आठवण राज ठाकरे यांनी यावेळी करून दिली. 

यावेळी जागावाटपाबाबत काहीही बोलण्यास नकार देतानाच त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. कोण किती जागा लढणार, हे आम्ही आताच सांगणार नाही. कारण महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये आणखी दोन टोळ्यांची भर पडली आहे. ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात, असे ते म्हणाले. शिवसेना-मनसेच्या दोन्ही पक्षातील उमेदवारांना अर्ज कधी भरायचा, हे सांगितले जाईल. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असेही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, दादर, शिवडी, वरळी आणि मुलुंड यांसारख्या मराठी बहुल भागांतील जागांवरून या दोन्ही पक्षांमध्ये तिढा होता. 

उद्धव ठाकरे यांनी देखील यावेळी भाजपावर टीका केली. भाजपाला जे करायचे ते करू दे, मराठी माणसासाठी जे करायचे ते आम्ही करू, असे त्यांनी सांगितले. यापुढे मुंबई आणि महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहील त्याचा खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपने कटेंगे तो बटेंगे असा अपप्रचार केला होता. आता मी मराठी माणसाला सांगतो की, आता चुकाल तर संपाल, त्यामुळे मराठीचा वसा टाकू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

महाविकास आघाडीचा विस्तार?

या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षालाही सोबत घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे समजते. जर हे तिन्ही पक्ष एकत्र आले, तर मुंबईच्या निवडणुकीत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.ठाकरे बंधूंच्या या नव्या ‘केमिस्ट्री’मुळे मुंबईच्या सत्तेची चावी कुणाकडे जाणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.