नोकर भरती केली... तरुणांचा जॉईन होण्यास नकार... बँक अडचणीत...

Share:
Main Image
Last updated: 24-Dec-2025

मुंबई, (प्रतिनिधी) २४ डिसेंबर - पालघर जिल्ह्यातील दि जव्हार अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असल्याने बँकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्याअनुषंगाने बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोकर भरतीच्या काही तरतुदींमध्ये बदल करण्याची विनंती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना बैठकीमध्ये केली. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

दि जव्हार अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये कनिष्ठ लिपिकाच्या 15 पदांसाठी भरती प्रक्रिया शासनमान्य संस्थेकडून करण्यात आली होती. तथापि संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर तीन उमेदवारांनी सेवा स्वीकारण्यास नकार दिला, तर अन्य दोन उमेदवारांनी अंतिम निवड होऊनही प्रतिसाद दिला नाही. नियमानुसार प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली असता, काही उमेदवारांबाबत पुन्हा तोच प्रकार घडला. त्यामुळे बँकेत सद्यस्थितीत केवळ सात कनिष्ठ लिपिक कार्यरत आहेत. परिणामी, बँकेचे दैनंदिन कामकाज, ग्राहक सेवा तसेच कर्ज वसुली प्रभावित होण्याची भीती बँकेने व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या दालनात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांनी भरतीबाबतचे काही निकष बदलण्याची विनंती मंत्री पाटील यांना केली.

सद्यस्थितीत लागू असलेल्या शासन नियमानुसार, रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रत्येक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी तयार करून, सदर अंतिम यादीनुसार भरावयाच्या रिक्त पदांच्या २० टक्के पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी शासनमान्य संस्थेकडून उपलब्ध करून घेणे बंधनकारक आहे. ही यादी नियुक्तीच्या प्रथम आदेशापासून ३६५ दिवसांपर्यंत अमलात राहील, असाही शासन नियम सध्या प्रचलित आहे. या तरतुदीमध्ये बदल करून, सदरची मर्यादा रिक्त पदांच्या ५० टक्के पर्यंत करण्याची विनंती बँकेच्या वतीने यावेळी करण्यात आली. त्यानुसार सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला सहकार विभागाचे सह सचिव संतोष पाटील, जव्हार अर्बन बँकेचे अध्यक्ष आसिफ लुलानिया, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मुकणे, कोकण विभागाचे विभागीय सहनिबंधक भालेराव आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet.