नाशिक, (प्रतिनिधी) २४ डिसेंबर - येवला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करावे. नगरपालिका ही लोकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असते. त्यामुळे पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असे आवाहन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या विजयी तसेच निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विजयी उमेदवारांनी मंत्री भुजबळ यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी विजयी उमेदवारांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पराभूत उमेदवारांनी खचून न जाता पुन्हा आपले काम सुरु ठेवावे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावे असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.
यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष वंसत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, राजेश भांडगे, शहराध्यक्ष दीपक लोणारी, माजी जिल्हा परिषद सभापती संजय लोणारी, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्यासह विजयी उमेदवार पदाधिकारी व कायकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
निवडणुकीत मिळालेला हा विजय म्हणजे येवलेकर जनतेचा विकासावरचा विश्वास आहे. त्यामुळे येवला शहरासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.