नात्यांची ताकद, स्त्रीची भूमिका आणि आधुनिक काळातील सावित्रीचा संघर्ष... 'सावित्री कलियुगातली'... या तारखेपासून चित्रपटगृहात...

Share:
Main Image
Last updated: 23-Dec-2025

पुणे, (प्रतिनिधी) २३ डिसेंबर - मराठी चित्रपटसृष्टीचे एक वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे परंपरा जपत, जुन्या-नव्या विचारांची सांगड घालत मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देणारे चित्रपट निर्माण करणे. याच परंपरेत भर घालणारा, नात्यांचा अर्थ उलगडणारा आणि स्त्रीशक्तीचे दर्शन घडवणारा “सावित्री कलियुगातली” हा मराठी चित्रपट येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्रात वटसावित्रीचा सण श्रद्धेने साजरा केला जातो. सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवणाऱ्या सावित्रीची कथा सर्वश्रुत आहे. याच कथेनुसार पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा या भावनेतून महिला वटसावित्रीचे व्रत करतात. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे, आधुनिकतेच्या झपाट्यामुळे आणि व्यस्त दिनक्रमामुळे हे व्रत आज कमी प्रमाणात दिसून येते.

खरं तर सण-व्रत हे केवळ विधी नसून त्यामागील खरा हेतू म्हणजे पती-पत्नीमधील नाते दृढ होणे, प्रेम, समजूतदारपणा, मैत्री आणि जिव्हाळा टिकून राहणे. आजच्या काळात घटस्फोटांचे वाढते प्रमाण पाहता ही मूल्ये कुठेतरी हरवत चालली आहेत. तरीही कलियुगातही अशा अनेक “सावित्री” आहेत, ज्या आपल्या पतीच्या संकटसमयी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभ्या राहतात. याच वास्तवाचे प्रभावी चित्रण “सावित्री कलियुगातली” या चित्रपटातून करण्यात आले आहे.

या चित्रपटात पत्नी-पतीच्या नात्याबरोबरच आई-वडील-मुलगा या नात्यांचेही सूक्ष्म चित्रण पाहायला मिळते. वडिलांची शिस्त झुगारून आईच्या लाडामुळे बिघडत जाणारा मुलगा, संकटात सापडल्यानंतर आईने त्याच्यासाठी केलेली पूजा-तपश्चर्या आणि एकीकडे पत्नी तर दुसरीकडे आई – या दोन्ही नात्यांमधील भावनिक संघर्ष आणि जिव्हाळा हा चित्रपट प्रभावीपणे मांडतो. त्यामुळे हा सिनेमा विशेषतः महिला प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

चित्रपटाची सर्जनशील टीम : सावित्री कलियुगातली या चित्रपटाचे निर्माते, कथा, पटकथा व दिग्दर्शन – प्यारेलाल शर्मा, सहनिर्माते – नानासाहेब बच्छाव आणि रविकुमार गजभिये,  कलाकार : नायक – पवन चौरे (पुणे), नायिका-मेहेक शेख (मुंबई), मुख्य भूमिका – श्वेता भामरे, निशांत पवार (नाशिक), खलनायक – जयराज नायर, नानासाहेब बच्छाव, इतर कलाकार – राकेश शिर्के, जी. एस. पाटील, रविकुमार गजभिये, विधी, संतोष, पंकज पंडित, सुजाता पवार
बालकलाकार* – नमो गजभिये, तांत्रिक बाजू :संवाद लेखन – राकेश शिर्के, सुजाता पवार, संगीत – दर्शन कहार, तुहीन विश्वास, गीतकार – सुजाता पवार, अनिल अहिरे, छायाचित्रण (DOP) – गणेश पवार, पंकज, सहदिग्दर्शन – राकेश शिर्के, सुजाता पवार, कार्यकारी निर्माता (EP) – पोपट कांबळे, या चित्रपटाचे चित्रीकरण नाशिक, उरण आणि बदलापूर येथे करण्यात आले आहे.

चित्रपटाची कथा प्रभावी आणि सामाजिक आशयाने भरलेली असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या चित्रपटाला शुभेच्छा देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी, “सावित्री कलियुगातली” हा सिनेमा प्रत्येकाने पाहावा, असे आवाहन करत निर्मात्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

No comments yet.