राष्ट्रवादीकडून नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर जबाबदारी.... महायुती न झाल्यास अशी आहे राष्ट्रवादीची रणनिती...

Share:
Main Image
Last updated: 23-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) २३ डिसेंबर - नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी अनुभवी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर नाशिक शहराची संपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. नाशिकचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन माजी खासदार समीर भुजबळ यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

नाशिक शहरातील संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि जनतेशी असलेले दृढ नाते लक्षात घेता, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने निवडणूक रणनिती आखण्यास सुरुवात केली असून, प्रत्येक प्रभागात सक्षम, जनाधार असलेले उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे. नुकत्याच माजी खासदार समीर भुजबळ यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. तसेच महायुती घटक पक्षांशी युती करण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज आहिरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भाजप व शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी व संभाव्य राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेऊन भाजप व शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही राजकीय चर्चा केल्या आहेत. या चर्चांमधून नाशिकच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत, शहराच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेण्यावर भर देण्यात आला आहे.

युती संदर्भात चर्चा सुरू असली तरी, युती न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी स्वबळावर निवडणूक लढविण्यास पूर्णपणे सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिला आहे. स्वबळावर लढण्यासाठी संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन, कार्यकर्ता प्रशिक्षण आणि जनसंपर्क अभियान यांची सखोल आखणी सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्व आमदार, पदाधिकारी व प्रमुख नेत्यांना सोबत घेऊन समीर भुजबळ नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे सुयोग्य, शिस्तबद्ध आणि प्रभावी नियोजन करत आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व आमदारांशी समन्वय साधत, एकसंघपणे निवडणूक लढविण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने सुरु आहे.

Comments

No comments yet.