नाशिक, (प्रतिनिधी) २३ डिसेंबर - 'जस्ट डायल'वर कॉल करणे नोकरदार महिलेसह शहरातील एकास चांगलेच महागात पडले आहे. सायबर भामट्यांनी दोघांची सव्वा दोन लाख रूपयांची फसवणूक केली असून मोबाईलवर पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून गोपनीय माहिती मिळवीत संबधितांचे बँक खाते परस्पर रिकामे करण्यात आले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनुमाननगर भागात राहणाऱ्या नोकरदार महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. नियमित आरोग्य तपासणीसाठी महिलेने गेल्या १८ ऑक्टोबर रोजी जस्ट डायलवर संपर्क साधून पिंपरीकर हॉस्पिटलचा नंबर मिळवला होता. यानंतर ९३४१६७०१३४ या मोबाईल क्रमांकावरून महिलेशी संपर्क साधण्यात आला होता. संबधीताने सदर हॉस्पिटल मधून बोलत असल्याचे सांगून नंबर लावण्यासाठी व्हॉटसअपवर पाठविलेल्या लिंकवर माहिती भरण्यास सांगून ही फसवणुक केली. महिलेने सदर लिकवर आपली गोपनीय माहिती भरली असता रविवारी (दि.२१) सायंकाळी तिच्या बँक खात्यातील १ लाख ३९ हजाराची रोकड परस्पर अन्य खात्यात वर्ग करून काढून घेण्यात आली.
याचप्रमाणे श्रीरामनगर भागात राहणारे महेंद्र उत्तम कापसे याचीही फसवणूक करण्यात आली असून सायबर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातील ८८ हजार रूपयांची रक्कम परस्पर ऑनलाइन काढून घेतली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक पाटील करीत आहेत.
उघड्यावर जुगार खेळणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या
नाशिक : जेलरोड भागात उघड्यावर जुगार खेळणाऱ्या तीन जुगारीच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय श्रीराम बेलेकर,राज दिेश यादव व बिकल महेश यादव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत. याबाबत अंमलदार सागर आडणे यांनी फिर्याद दिली आहे. जेलरोड येथील सैलानी बाबा भागात काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती नाशिकरोड पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२२) रात्री पथकाने छापा टाकला असता संशयित बालाजी डोसा सेंटर मागील पत्राशेडच्या आडोशाला उघड्यावर कल्याण मिलन नावाचा ममटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे १ हजार ४०० रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.