नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २३ डिसेंबर - केंद्रीय दूरसंचार विभागाला (डीओटी) हे कळवताना अत्यंत आनंद होत आहे की, विभागाच्या वित्तीय घोटाळे जोखीम निर्देशकाची (एफआरआय) लक्षणीय कामगिरी, भारतीय रिझर्व्ह बँक आणि राष्ट्रीय पेमेंट्स महामंडळ यांच्याकडून मिळालेल्या सक्रीय पाठिंब्यामुळे शक्य झाली असून त्यामुळे, बँका, वितीय संस्था तसेच त्रयस्थ ऍप्लिकेशन पुरवठादार (टीपीएपीज) मोठ्या प्रमाणात दूरसंचार विभागाच्या अखत्यारीतील डिजिटल बुद्धिमत्ता मंचामध्ये (डीआयपी) सहभागी झाल्या आहेत. आजघडीला, 1000 पेक्षा जास्त बँका, टीपीएपीज तसेच भरणा यंत्रणा परिचालकांनी (पीएसओ) या मंचावर सहभाग नोंदवला आहे आणि अत्यंत उत्साहाने या निर्देशकाचा स्वीकार करण्याची सुरुवात केली आहे.
वित्तीय घोटाळे जोखीम निदर्शकाच्या मदतीने या उपक्रमाला 22 मे 2025 रोजी सुरुवात झाल्यापासून केवळ 6 महिन्यांच्या कालावधीत सायबर घोटाळ्यांमुळे होऊ शकणारे सुमारे 660 कोटी रुपयांचे नुकसान रोखण्यात आले आहे.विविध सरकारी बँका, खासगी क्षेत्रातील बँका, सहकारी बँका, टीपीएपीज तसेच इतर वित्तीय संस्थांनी कळवलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणातील संशयित व्यवहार एकतर थांबवण्यात आले आहेत किंवा डीआयपीवर उपलब्ध असलेल्या वित्तीय घोटाळे जोखीम निदर्शकाचा वापर करून इशारेवजा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. याद्वारे, बँकिंग परिसंस्थेमध्ये होऊ शकणारे सुमारे 660 कोटी रुपयांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळता आले आहे.
अत्यंत सुनियोजित डिजिटल टोळीप्रमाणे काम करणाऱ्या घोटाळेबाजांमुळे अलीकडच्या काही वर्षांत भारताचे सायबर गुन्हे विषयक परिदृश्य नाट्यमयरीत्या बदलले आहे आणि या गुंतागुंतीच्या परिस्थितीत सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यात एक घटक सर्वात निर्णायक शक्ती म्हणून उदयाला आला आहे: लोक सहभाग.
केंद्रीय दूरसंचार विभागाने संशयित फसवणुकीसाठीच्या संवादाची माहिती कळवण्यासाठी, अनेकांच्या नावावर घेतलेल्या खोट्या जोडण्यांची तसेच हरवलेल्या/चोरलेल्या मोबाईल फोन्सची माहिती देण्यासाठी संचार साथी मंचाचा (www.sancharsaathi.gov.in या संकेतस्थळावर तसेच अँड्रॉइड आणि आयओएस यापैकी कोणतीही प्रणाली वापरणाऱ्या मोबाईलवरील ऍपच्या माध्यमातून)धडाडीने वापर करत असलेल्या सर्व दक्ष नागरिकांच्या आणि सायबर योद्ध्यांच्या प्रयत्नांची दखल घेत त्यांची प्रशंसा केली आहे. उपरोल्लेखित ऍप डाऊनलोड करण्याचे तसेच संचारसाठी मोबाईल ऍपच्या वापराचे अलीकडील कल लक्षात घेतले तर त्यातून नागरिकांनी या मंचावर पुन्हा एकदा दाखवलेला विश्वास आणि सायबर गुन्हे रोखण्यात त्यांची सक्रीय भूमिका दिसून येते. घोटाळेबाजांद्वारे होणारा दूरसंचार संसाधनांचा गैरवापर कमी करण्यात आणि अधिक सुरक्षित आणि अधिक सशक्त डिजिटल परिसंस्था निर्माण करण्यात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभागाचे लक्षणीय योगदान आहे.
सर्व नागरिकांना नागरिककेंद्री सेवा प्राप्त करण्यासाठी संचार साथी वेब पोर्टल आणि मोबाईल ऍपचा वापर करण्याचे आवाहन डीओटीने केले आहे.
संचार साथी उपक्रमाविषयी माहिती
संचार साथी हा मोबाईल धारकांना सक्षम करण्यासाठी, त्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि सरकारच्या नागरिक-केंद्री उपक्रमांविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाने (डीओटी) सुरु केलेला नागरिक-केंद्री उपक्रम आहे. मोबाईल ऍप आणि पोर्टलच्या माध्यमातून (www.sancharsaathi.gov.in) सर्वांसाठी संचार साथीची सुविधा उपलब्ध आहे. संचार साथीद्वारे नागरिकांसाठी अनेक उपयुक्त सेवा पुरवल्या जातात.
संचार साथी उपक्रमातील महत्त्वाच्या सुविधा:
• चक्षु-संशयित फसव्या संवादांची माहिती देणे: थेट मोबाईल फोनच्या लॉग्जवरुन संशयित कॉल्स आणि एसएमएसची तात्काळ माहिती देणे.
• तुमच्या नावावर नोंदवलेल्या मोबाईल जोडण्यांची माहिती करून घेणे: तुमच्या नावावर असलेल्या सर्व मोबाईल क्रमांकांची माहिती घेऊन त्यांचे व्यवस्थापन करणे, जेणेकरून अनधिकृत जोडण्या शोधून त्यांचे कार्य बंद करणे शक्य होईल.
• हरवलेल्या अथवा चोरलेल्या मोबाईल हँडसेट्सचे कार्य बंद करणे: तुमचा मोबाईल जर हरवला अथवा चोरीला गेला तर तुमचा मोबाईल हँडसेट बंद करणे, त्याचा मागोवा घेणे आणि तो परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणे
• मोबाईल हँडसेटचा अस्सलपणा तपासणे: कोणताही हँडसेट खरेदी करण्यापूर्वी तो अस्सल आहे अथवा नाही यांची अत्यंत सोपेपणाने पडताळणी करणे
• विश्वसनीय संपर्क तपशील: बँका आणि वित्तीय संस्थांसाठी प्रमाणित संपर्क माहिती उपलब्ध होणे.
खालील लिंक्सचा वापर करून संचार साथी मोबाईल ऍप डाऊनलोड करता येऊ शकेल:
अँड्रॉइड: https://play.google.com/store/apps/details?id=com.dot.app.sancharsaathi
आयओएस: https://apps.apple.com/app/sanchar-saathi/id6739700695