व्हॉटसअप ग्रुप जॉईन केला आणि तब्बल पावणे दोन कोटींना चुना लागला...

Share:
Main Image
Last updated: 23-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) २३ डिसेंबर - शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील तीन व्यावसायिकांना तब्बल पावणे दोन कोटी रुपयांना चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हॉटसअप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने व्यावसायिक भामट्यांच्या भूलथापांना बळी पडले असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपासून शहर तसेच ग्रामीण भागात सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत आहे. यामध्ये शेअर बाजारात जादा परतावा मिळवून देतो असे सांगत आभासी पध्दतीने अनेकांना गंडा घातला जात आहे. यामध्ये शिक्षित, नोकरदार यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनाही गेल्या ऑगस्ट महिन्यात सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क केला. यावेळी शेअर बाजारात पैसे गुंतवणुक करण्याचा सल्ला सायबर भामट्यांकडून देण्यात आला. तिघा व्यावसायीकांना समाविष्ट करण्यात आलेल्या व्हाटसअप ग्रुपवर अन्य गुंतवणुकदार नियमीत पणे आपल्या नफ्याचे स्क्रीन शॉट टाकत असल्याने शहरातील व्यावसायीक भामट्यांच्या भूलथापांना बळी पडले. गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखविण्यात आल्याने व्यावसायीकाने टप्याटप्याने गुंतवणुक केली. प्रारंभी गुंतवलेल्या पैशांचा परतावा चांगला मिळाला मात्र त्यानंतर व्यावसायिकास लालूच दाखवून अधिकची रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेत भामट्यांनी व्यावसायिकाने वेगवेगळ्या बँकेत भरलेली एक कोटी ७७ लाख रुपये उकळले. हे पैसे गुंतवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर परतावा दिसत असतांना तक्रारदारांना ते पैसे खात्यावर दिसतात पण काढता येत नाही अशी स्थिती होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारानी सायबर पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करत आहेत.

शस्त्रबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल 

नाशिक - सिडको परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक पथकाने केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणव विनोद शेवाळे (२३, रा. कामटवाडे, सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. वर्दळीच्या दिव्या अ‍ॅड लॅब भागात एक तरूण गावठी कट्याचा धाक दाखवित व्यावसायीकांना खंडणीसाठी धमकावित असल्याची माहिती युनिटचे हवालदार मिलिंदसिंग परदेशी व नाईक प्रशांत मरकड यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.२१) रात्री उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, श्रेणी, शिरसाठ, हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, नाझीमखान पठाण, प्रशांत मरकड, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी, रोहिदास लिलके, विशाल देवरे, शर्मिला कोकणी, सुकाम पवार, पोलीस नाईक अमोल कोष्टी, मुक्तार शेख, उत्तम खरपडे आदींच्या पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून  सुमारे ३० हजारांचा देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून त्यास मुद्देमालासह अंबड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी हवालदार मिलिंदसिंग परदेशी यांनी फिर्याद दिली असून तपास सहाय्यक निरीक्षक पलाडे करीत आहेत.

Comments

No comments yet.