नंदुरबार, (प्रतिनिधी) २३ डिसेंबर - जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या उपस्थितीत इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस व एकिबेकी संस्थेच्या प्रतिनिधींनी तोरणमाळ येथे भेट देऊन पर्यटन विकासाशी संबंधित विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भेटीच्या दरम्यान तोरणमाळ येथील ग्रामीण मार्टसाठी प्रस्तावित जागेची पाहणी तसेच रस्त्यांच्या कामांची तपासणी करण्यात आली. स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्रामीण उत्पादनांचे मूल्यवर्धन करणे, तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पर्यटनविकासाच्या दृष्टीने तोरणमाळ येथे ४ दिवसीय वार्षिक मेळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
तसेच तोरणमाळ येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी व पर्यटनाला अधिक वाव मिळावा यासाठी रिसॉर्ट उभारणीसाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे निर्देश मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पर्यटन, पायाभूत सुविधा व स्थानिक सहभाग यांचा समन्वय साधून तोरणमाळचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात आला.
या भेटीमुळे तोरणमाळचा पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे समावेश होण्यास मदत होईल, तसेच स्थानिक नागरिकांना रोजगार व उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.