नाशिक, (प्रतिनिधी) २३ डिसेंबर - कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक/ कळवण यांच्या संयुक्त विद्यामाने 22 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यांतर्गत आदिवासी भागातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी चार दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ आज कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, रामेती, नाशिक येथे झाला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखून शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी रवाना केले, असे आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी यावेळी अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी या अभ्यास दौऱ्यातून स्ट्रॉबेरी पीक, प्रक्रिया याबाबत सखोल माहिती घेऊन त्यानुसार आपल्या भागात त्यांचा अवलंब करावा व परिसरातील शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी (नाशिक) तथा एकात्मिक आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, प्रकल्प उपसंचालक संदीप वळवी, ‘स्मार्ट’ नाशिकचे प्रकल्प अधिकारी विजय पवार, आदिवासी विकास विभागाचे शांताराम दाभाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
अभ्यास दौऱ्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सप्तश्रृंगी शेतकरी उत्पादक कंपनी लि.खोरीपाडा ता.दिंडोरी चे 40 सदस्य व बोरगाव स्ट्रॉबेरी शेतकरी उत्पादक कंपनी लि.बोरगाव, ता.सुरगाणा यांचे 40 सभासद सहभागी झाले आहेत. या दौऱ्यात शेतकरी पुणे व सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी लागवड करणारे शेतकरी, प्रक्रिया उद्योग करणाऱ्या एफ पी सी, संशोधन केंद्र या ठिकाणी भेट देणार असल्याचे प्रकल्प संचालक श्री. काशिद यांनी कळविले आहे.