नाशिक (प्रतिनिधी) २३ डिसेंबर - शहरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यात मुलींचे प्रमाण मोठे आहे. वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तीन मुली काही दिवसांपासून बेपत्ता असून त्यांना कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचा अंदाज कुटूंबीयांनी वर्तविला आहे. याबाबत आडगाव, उपनगर व इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदूरनाका भागात राहणारी मुलगी शुक्रवार (दि.१९) पासून बेपत्ता आहे. सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडली ती अद्याप घरी परतली नाही. सर्वत्र शोध घेवूनही ती न सापडल्याने कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली असून याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत. दुसरा प्रकार पाथर्डी फाटा भागात घडला. नरहरी नगर भागात राहणारी मुलगी रविवारी (दि.२१) सकाळी घराबाहेर पडली ती अद्याप परतली नाही. तिला कोणी तरी फूस लावून पळवून नेल्याचा अंदाज पालकांनी वर्तविला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत. तर पाडेकर गॅस एजन्सी भागात राहणारी तरूणी शनिवारी (दि.२०) सकाळी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी महाविद्यालयात गेली होती. दोन दिवस उलटूनही ती घरी परतली नसून उपनगर पोलीस ठाण्यात याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.
प्रेमाच्या जाळ्यात अडकवत अत्याचार
नाशिक : प्रेमाच्या जाळ्यात अडकवत एकाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कुटुंबीयांस जीवे ठार मारण्याची धमकी देत संशयिताने राधाकृष्णनगर भागात राहणाऱ्या मित्राच्या घरात हे कृत्य केले आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात बलात्कार व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्तिक दीपक तिवडे (२०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये तिची संशयिताशी ओळख झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर संशयिताने एप्रिल २०२४ मध्ये मुलीस राधाकृष्ण नगर येथील साईनाथ चौकात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या घरी भेटण्यासाठी बोलावले. घरात कुणी नसल्याची संधी साधत या ठिकाणी संशयिताने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. यावेळी त्याने वाच्यता केल्यास आई - वडील आणि भावास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही वेळोवेळी मुलीस मित्राच्या घरी बोलावून घेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. हा प्रकार वाढल्याने मुलीने आपबिती आपल्या कुटुंबीयांना सांगितली. हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक दहिफळे करीत आहेत.